चार परीक्षा केंद्रांवर ३ हजार विद्यार्थ्यांनी दिली ‘अम्मा की पढाई’ उपक्रमाची चाचणी परीक्षा.

  • चार परीक्षा केंद्रांवर ३ हजार विद्यार्थ्यांनी दिली ‘अम्मा की पढाई’ उपक्रमाची चाचणी परीक्षा.
  • आमदार किशोर जोरगेवार यांचा अभिनव उपक्रम, गरजू विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण.



शहरातील गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या अम्मा की पढाई या शैक्षणिक उपक्रमांतर्गत चाचणी परीक्षा रविवारी उत्साहात पार पडली. चंद्रपूर शहरातील चार परीक्षा केंद्रांवर एकूण ३ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.


अम्मा की पढाई या उपक्रमाची चाचणी परीक्षा जनता महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, एफ.ई.एस. गर्ल्स महाविद्यालय आणि आंबेडकर महाविद्यालय या चार परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेला जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांना मोफत कोचिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिक्षण साहित्य आणि वेळोवेळी करिअर मार्गदर्शन पुरविले जाणार आहे.
अम्मा की पढाई हा उपक्रम आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू केला असून, गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम चंद्रपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व इतर सर्व व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. परीक्षेनंतर लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन वर्गात प्रवेश दिला जाईल.
शहरातील विविध भागांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. शिक्षणाच्या संधी आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या हातून निसटतात, हे जाणूनच आमदार किशोर जोरगेवार यांनी समाजातील शेवटच्या घटकासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील शैक्षणिक वातावरण उन्नत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी ‘अम्मा की पढाई’ उपक्रम मोलाची भूमिका बजावत आहे.



या परीक्षेच्या आयोजनात परिक्षा प्रमुख म्हणून आंबेडकर कॉलेजचे उपप्राचार्य संजय बेले यांनी जबाबदारी सांभाळली. परीक्षेचे नियोजन व समन्वयक म्हणून सुमित बेले यांनी काम पाहिले. उपकेंद्र प्रमुख म्हणून सरदार पटेल महाविद्यालयात राज्यकर निरीक्षक निलेश मालेकर, आंबेडकर कॉलेजमध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, जनता कॉलेजमध्ये नायब तहसीलदार गिरीश बोर्डे, तर एफ.ई.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये तृपाल कोल्हे यांनी काम पाहिले. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य प्रमोद कातकर, प्राचार्य राजेश दहेगावकर, प्राचार्य आशिष महाताले, प्राचार्य राजेश चिमनकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
Previous Post Next Post