ग्रंथोत्सवामुळे वाचन चळवळीला मिळते प्रोत्साहन* *-आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

ग्रंथोत्सवामुळे वाचन चळवळीला मिळते प्रोत्साहन
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन



चंद्रपूर - ग्रंथ मानवी जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावितात. मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर वाचनालये सुरू करण्याबाबत आग्रही होतो. चंद्रपूर, बल्लारपूर, मुल व पोंभूर्णा येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय उभारले. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालयाचा उपयोग करत आहेत. विपरित परिस्थितीवर मात करत यशाचा झेंडा उंच फडकावत आहेत, हे या गोष्टीचे द्योतक आहे. अलीकडच्या काळात वाचन कमी होत असताना ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात. अशा कार्यक्रमांमधून वाचन चळवळीला प्रोत्साहन मिळते, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 


आ. श्री. मुनगंटीवार यांनी ग्रंथोत्सवाला भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ साहीत्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी, डाॅ. शाम मोहोरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे, अनिल बोरगमवार आदी उपस्थित होते. व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या युगामध्ये ग्रंथवाचन, ग्रंथखरेदी किंवा प्रकाशक या संदर्भातील आस्था दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.


आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात ग्रंथोत्सव, ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन होत आहे. समाजावर दीर्घकालीन चांगले परिणाम करणारे जे विषय आहेत, त्यात ग्रंथ वाचन आणि प्रोत्साहन याचा देखील समावेश आहे. मी अर्थमंत्री असताना मुंबईतील एशियाटिक लायब्ररीला 15 कोटी रुपयांचा निधी न मागता उपलब्ध करुन दिला. चंद्रपूर जिल्हा ग्रंथालयाचे बांधकाम आणि तत्सम कामासाठी 14 कोटी 90 लक्ष रुपये मंजूर केले. विदर्भातील उत्तम असे हे ग्रंथालय होऊन याठिकाणी चर्चा, चिंतन व विविध विषयावर मंथन होईल. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून या क्षेत्रामधील असणाऱ्या उणिवा आणि 21 व्या शतकातील आव्हाने निश्चितपणे लिहिल्या गेली पाहिजे.’ 


या ग्रंथोत्सवाला मोठं रूप देण्याची आवश्यकता आहे. चांदा क्लब ग्राउंड येथे भव्य ग्रंथोत्सवाचे आयोजन होईल तेव्हा हजारो विद्यार्थी सहभागी होतील. पुस्तकांचे शेकडो दालन लागतील. लाखो पुस्तके विकल्या जाईल, तेव्हा खऱ्या अर्थाने ग्रंथोत्सवाचे उद्दिष्ट साध्य होईल, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी, ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ग्रंथालय चळवळीचे प्रणेते डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
Previous Post Next Post