◼️निर्माणाधीन मेडिकल कॉलेजच्या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी.
⚫ संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती, उर्वरित निधीसाठी करणार पाठपुरावा..
चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातील रुग्णांसाठी वरदान ठरणारे चंद्रपूर मेडिकल कॉलेज आणि कॅन्सर रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येथील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मेडिकल कॉलेजची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रलंबित कामांसाठी लागणारा असलेल्या १८० कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे, कॅन्सर रुग्णालयाचे प्रमूख डॉ. कपुरिया, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.निवृत्ती जिवणे, भारतीय जनता पक्षाचे नेते दशरत सिंग ठाकुर, तुषार सोम, मनोज पाल, अनिल फुलझेले मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, माजी नगर सेविका चंद्रकला सोयाम, वंदना जांभुळकर, जुमडे, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, आशा देशमुख, डॉ. गिरिधर येडे, धनराज कोवे, महेंद्र जुमडे, सलिम शेख आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे काम अंतिम टप्प्यात येवून निधी अभावी रखडले आहे. त्यामुळे सदर निधी तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. नागपूर येथील अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी हा विषय मांडत उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबई मंत्रालयात संबंधित विभागाची बैठक घेत येथील फर्निचर खरेदी प्रक्रिया गतीशील करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मेडिकल कॉलेजची पाहणी करत सध्यास्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मेडिकल कॉलेजच्या परिसरात फिरून उर्वरित कामांची प्रगती आणि अडचणी जाणून घेतल्या. हे पूर्ण होण्यासाठी निधीची कमतरता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी निधीचा प्रस्ताव पुन्हा तातडीने शासनाकडे पाठवावा त्याला मंजुरी मिळविण्यासाठी आपण पाठपूरावा करु असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर मेडिकल कॉलेज जिल्ह्यासाठीच नव्हे, तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकतील. तसेच बाहेर उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांचा त्रास कमी होईल. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून कार्य करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उर्वरित कामांमध्ये अंतर्गत उपकरणे, डॉक्टरांसाठी सोयीसुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक प्रयोगशाळेकरीता लागणारे उपकरणे लवकर उपलब्ध होणार आहे. चंद्रपूर मेडिकल कॉलेज हा जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एक नवा अध्याय उघडणार असून, यामुळे लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आपण शासन दरबारी निधीसाठी पाठपूरवा करणार असल्याचे ही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Tags
Chandrapur