*महिलांवर होणारा अत्याचार राजकारणाचा नाहीतर माझ्यासाठी काळजाचा विषय आहे ~शिवानी विजय वडेट्टीवार..*

महिलांवर होणारा अत्याचार राजकारणाचा
नाहीतर माझ्यासाठी काळजाचा विषय आहे ~शिवानी विजय वडेट्टीवार




नागपूर :- गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कायद्याचा ना धाक, ना जरब उरला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक वेळी राजकारण करू नका, राजकारणाचा विषय नाही म्हणून वेळ मारून नेत असले तरी गुन्हेगारांना काय शिक्षा दिली गेली हे त्यांनी सांगावे. हा विषय ना माझ्यासाठी, ना पक्षासाठी राजकारणाचा भाग आहे. पिडीत आणि पीडितेच्या कुटुंबाला आयुष्यभर होत राहणाऱ्या वेदनेचा सरकार कधी गांभीर्याने विचार करणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.


जोपर्यंत लोक रस्त्यावर येत नाही तोपर्यंत सरकार गुन्हा दाखल करत नाही. उच्च न्यायालय ताशेरे ओढते तरी सरकार भानावर येत नाही. आज माझ्यासह राज्यातील लाखो लोक रस्त्यावर उतरले तर त्यांना अटक करत आहे. जेलमध्ये टाकत आहे. का ? आम्ही काय गुन्हा केलाय. न्याय मिळत नाही म्हणून आंदोलन करतोय ना. न्यायायाठी लढणे आमचा अधिकार नाही का. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या तर बरे झाले असते, न्यायाची भूमिका घ्या. गुन्हेगार स्वपक्षातील असो की अजुन कोणी त्यांना वाचवू नका.


पिडीत आणि पीडितेच्या कुटुंबाला होणाऱ्या वेदनांनी काळीज पिळवटून निघते. आपली मुलगी, बहिण या नात्याने सरकारने न्यायाची भूमिका घ्यावी एवढीच आमची मागणी आहे. अत्याचार हा माझ्यासाठी राजकारणाचा नाही तर काळजाचा विषय आहे. तसाच तो राज्यातील समस्त जनतेचा आहे. एखादी घटना घडली की केवळ मेणबत्त्या पेटवून निषेध व्यक्त करणे एवढ्या पुरता हा विषय मर्यादित नाही.


पुण्यातील ड्रग माफिया, हिट अँड रन प्रकरण, महिला अत्याचाराच्या घटना यामुळे महाराष्ट्र होरपळून निघत आहे. कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. म्हणूनच आज आम्ही त्यांच्या नागपूर येथील देवगिरी बंगल्यासमोर आंदोलन केले.
Previous Post Next Post